वेरूळ !!
खूप जुनी एक गोष्ट आहे. देवांनी इंद्र देवाला विनंती केली की आम्हाला पृथ्वीवरचे एक मंदिर बघायला जायचे आहे. इंद्र म्हणाला ठीक आहे, पण एक अट आहे. सूर्यास्त होण्याआधी तुम्हाला परत स्वर्गात यावे लागेल नाहीतर तिथेच अडकून पडाल. सगळे देव आले मंदिर बघायला, तिथलं सौंदर्य, ते स्थापत्य बघता बघता कसा दिवस गेला ते कळलंच नाही त्यांना. सूर्याचा शेवटचा किरण गेला आणि सगळे देव तिथेच थिजून गेले. अजूनही ते देव आपल्याला तिथे बघायला मिळतात. ज्या वास्तुनी देवालाही तिथेच थांबायला भाग पाडलं तेच हे कैलास मंदिर.
भव्य परिसरात पसरलेली वेरूळ ची लेणी. बदलत जाणाऱ्या शतकानुशतकांच्या वास्तुशास्त्र, मुर्तीशास्त्र यांची साक्षीदार. या लेण्यांचा मुकुटमणी म्हणजे कैलास. त्या ठिकाणी जैन आणि बुद्ध लेणी पण आहेत जी आपापल्यला परंपरेचं दर्शन घडवतात.
|
Verul - Kailas Temple |
साधरण आठव्या शतकामध्ये अनेक अज्ञात हात ही परिपूर्ण वास्तू घडविण्यात मग्न होते. “आधी कळस मग
पाया” असा अभूतपूर्व प्रयोग तिथे चालू होता. हातोडीचा किंवा छीन्नीचा बसलेला एक चुकीचा धक्का हा या संपूर्ण मंदिर घडवण्याचे काम थांबवायला पुरेसा होता. अपार कष्ट, निष्ठा आणि कला यांच्या सहाय्याने हि प्रचंड वास्तू त्या शिल्पिंनी अनेक वर्ष राबून तयार केली. त्या काळी कोरलेल्या मूर्ती आणि आत्ताचे आपण यामध्ये १००० वर्षांची एक वैचारिक दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या वास्तू मधल्या संकल्पना समजायला अवघड जातात. डॉ. दिगलुरकर सर, श्री. उदयन इंदुरकर सर यांसारख्या लोकांनी केलेल्या प्रचंड अभ्यासामुळे शिल्पातून त्या कलाकारांनी जे प्रचंड ज्ञानाचं आणि सौंदर्याचं भांडार आपल्यासमोर मांडून ठेवलं आहे त्याची कल्पना यायला मदत होते.
|
Sculpture of Ganga |
फक्त धर्म किंवा धार्मिकता हा उद्धेश न ठेवता कलाकारांनी विज्ञान, समाज, कला, तत्वज्ञान आणि तांत्रिक विद्या अशा अनेक पैलूंना स्पर्श केलं आहे. शंकर, विष्णू याचं तत्वज्ञान, वामन आणि विष्णू यांच्या द्वारे दाखविलं गेलेलं विज्ञान, नटराज – सप्त मातृका – काल यामधून दाखवलेल जीवन चक्र, नाजूक आणि सुंदर गंगा, रामेश्वर लेणीतील गंगा- तीचे वाहन म्हणजे मकर – ते चालू लागले, त्या धक्क्यामुळे ते सरकलेलं वस्त्र अलगद तिच्या पायाला चिकटले, आणि त्या वस्त्रातून अर्धवट दिसणारी गुडघ्याची वाटी – या बारकाईने कोरलेले शिल्प, उत्तर आणि दक्षिणेला अनुक्रमे कोरलेलं अखंड महाभारत आणि रामायण, कलाकारांनी उठाव केल्यासारखी कोरलेली जटायू-रावण आणि नृसिंह-हिराण्याकाश्यपू युध्य, दशावतार लेणी मधल्या नृसिंहाच्या चेहऱ्यावरचा राग, रावणाचा कैलासतोरणाचा वेडा प्रयत्न, त्याला चिडवणारे-त्रास देणारे शिवा चे गण आणि शांत असलेला शंकर, शिवाच्या तांडवाचे अनेक प्रकार, स्पर्शितं आणि घटीतकं हि सुंदर अशी चुंबन शिल्प, कुठल्याही दोन शिल्पांमध्ये दागिन्यांची पुनरावृत्ती नाही आहे, मंदिरावर चारही बाजूंना कोरलेले गंधर्व कुठेही एकसारखे नाही आहेत, विश्वास नाही बसणार पण हे सर्व एकाच ठिकाणी पाहायला मिळत. इंदुरकर सरांनी या सगळ्याचं दोन ओळींमध्ये सुंदर वर्णन केलंय , “ कोमलतेला कोमेजण्याचा अभिशाप असतो. कठोर काळ्या कातळावर कमनीय कलाकृती कोरून कलाकाराने कोमलतेला कलातीत केले ”
कलाकाराची त्याच्या आयुष्यात एक तरी ‘Masterpiece’ तयार करावा हि इच्छा असते, वेरूळ मध्ये अश्या Masterpieces चे प्रचंड दालन तयार केले आहे.
|
Entire Ramayana sculpted in stone pannel |
एक घटना सांगायची आहे, काही वर्षांपूर्वी डॉ. गो.बं. देगलूरकर हे काही परदेशी पाहुण्यांना कैलास मंदिर दाखवीत होते. वर्णन करताना त्यांनी सांगितले की येथून तीस लक्ष घनफूट दगड हा केवळ मानवी हातांनी कोरून काढला आहे. हे करीत असताना कुठल्याही कलाकाराच्या हातून एक बारीक टवका सुद्धा अधिक उडवला गेला नाही. पर्यटकांपैकी एकाचे उत्स्फूर्त उद्गार आले, “Oh! Isn’t it wonderful!” यावर सरांनी उत्तर दिले – “No. I don’t think so, the very fact that this does not find its place in the list of wonders of the world is even more wonderful!”
आपल्याला हि गोष्ट कधीच जगाला ओरडून सांगावीशी वाटली नाही. आज प्रत्येकानं यावर थोडंसं विचार करायची गरज आहे.
शिल्पांविषयी बोलायचा माझा अधिकार नाही. पण एक गोष्ट नक्की थोडंसं स्वतःचं भान असेल तर हे लेणं तुम्हाला निशब्द करून टाकतं. आपल्या पूर्वजांना असलेली रसिकता आणि व्यापक विचार करायची क्षमता आज कुठे गेली हा प्रश्न मात्र पडल्याशिवाय राहत नाही.
No comments:
Post a Comment